साईमत, नाशिक । प्रतिनिधी
शहरातील अवैध धंद्यांसह तक्रारी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने पोलीस कंट्रोल रुमचा हेल्पलाईन क्रमांक जारी केला. या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत शहर पोलिसांनी शहरातील जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करीत २५ जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले. यामुळे शहरात चोरी छुप्या रितीने सुरू असलेल्या जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पंचवटी पोलिसांच्या हद्दीतील इंद्रकुंड भितींलगत जुगार अड्ड्यावर रविवारी (ता. २०) रात्री साडेआठ वाजता छापा टाकण्यात आला. त्यात लक्ष्मण सुरेश कराटे, विनायक दिगंबर कासार, गणेश बाळु लोणारे, सुशांत मोहन बरडीया (सर्व रा. पंचवटी) या जुगाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबई नाका पोलिसांनी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील व्ोद मंदिरालगतच्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्यांकडून ४ हजार रुपये व साहित्य जप्त करीत, जगदीश रंगनाथ पाटील, दिपक तम्मा धोत्रे (रा. कस्तुरबा नगर), साहेबराव मुकुंद शिंदे, आनंद यशवंत साळुंके (दोघे रा. सिडको), दिलीप शंकर पाटील (पंचवटी) या जुगाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे, त्रिमुर्ती चौकात जुगार खेळणाऱ्या ज्ञानेश्वर कृष्णा शिंदे, गजानन रावसाहेब तेलगड, प्रदीप लक्ष्मण पाटील, उमेश दत्ता नखाते यांच्याविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
अंबड एमआयडीसी चौकी पोलिसांनी संजीवनगरमधील जुगार अड्ड्यावर छापा टाकून रियासत रुखावत खान, अन्वर उल्लाखान, मोहसिन खलील मिर्झा, आसिम रईसमरहुम खान, शेर मोहम्मद खान, आझम अमीन खान, जमाल इर्शाद खान यांच्याविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला. नाशिकरोड हद्दीतही गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने गंगा पाडळी शिवारातील जुगार अड्ड्यावर कारवाई करीत शिवनाथ एकनाथ रुमे, भीमराव सखाराम सुरदुसे, रामदास महादू आहेर, रतनसिंग जाधव, बबन दामू पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.