साईमत, जळगाव : प्रतिनिधी
गायीचा दोर अडकल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात धरणगाव तालुक्यातील साकरे येथील रंजनाबाई धनराज पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वारसांना २ लाख ८६ हजाराची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने विमा कंपनीला नुकताच दिला.
सविस्तर असे की, धरणगाव-चोपडा रस्त्यावर ८ डिसेंबर २०१२ रोजी रिक्षा अपघातात रंजनाबाई यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रिक्षा चालक मुरलीधर परबत पाटील याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दुचाकी चालकाने जोरात हॉर्न वाजविला. त्यामुळे बाजूला चरणारी गाय सैरवैर पळताना तिच्या गळ्यातील दोर धावत्या रिक्षात अडकला. रिक्षा उलटल्याने प्रवासी जखमी झाले. तसेच प्रवासी रंजनाबाई पाटील यांचा मृत्यू झाला, असे तक्रारीत नमुद होते. रिक्षाचा संपूर्ण विमा पॉलिसी असल्याने अपघातातील मृत महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी न्यायालयात दाद मागितली.
अर्जदाराचे वकील ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांनी युक्तीवादात रिक्षात बसलेले प्रवासी हे थर्ड पार्टीच्या डेफिनिशनमध्ये येतात. म्हणून ॲक्ट पॉलिसी प्रवाशांना लागू होते. विमा कंपनीतर्फे तपासणी अधिकारी गंभीर शिंदे यांची साक्ष नोंदविण्यात आली. ॲड. चौधरी यांचा प्रभावी व अभ्यासपूर्ण युक्तीवाद लक्षात घेत न्यायालयाने याचे नातेवाईक नंदलाल धनराज पाटील यांना नुकसान भरपाईची रक्कम २ लाख ८६ हजार आणि अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून ते नुकसान भरपाई मिळेपर्यत ६ टक्के व्याज विमा कंपनीने देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. अर्जदारातर्फे ॲड. महेंद्र सोमा चौधरी, ॲड. श्रेयस महेंद्र चौधरी, ॲड. हेमंत जाधव यांनी काम पाहिले.