देव्हारीतील कार्यक्रमात डॉ. नितीन विसपुते यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
संवाद नसल्यामुळे मनातल्या भावना दाबल्या जातात, गैरसमज वाढतात, ताणतणाव निर्माण होतो आणि मग माणूस हळूहळू व्यसनाधीनतेकडे किंवा आत्महत्येसारख्या टोकाच्या मार्गाकडे वळतो. पण जर योग्यवेळी, मनापासून आणि खुलेपणाने संवाद झाला तर जीवनातले अनेक प्रश्न सुटू शकतात, असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.नितीन विसपुते यांनी केले. एम. जे. कॉलेजच्या जीवशास्त्र विभागामार्फत ह्युमन हेल्थ अँड हायजिन कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम अंतर्गत जळगाव तालुक्यातील देव्हारी येथे समाजाभिमुख कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. मनोजकुमार चोपडा, प्रा. मधुकर राठोड, प्रा. नूतन राठोड, प्रा. योगिता फालक, निलेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘मी व्यसन करणार नाही’ असा संकल्प करा
व्यसनामुळे घर उद्ध्वस्त होतात, कुटुंबात कलह होतो आणि सामाजिक रचना ढासळते. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी केवळ कायद्यांची अंमलबजावणी पुरेशी नाही तर प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर ‘मी व्यसन करणार नाही’ असा संकल्प केला पाहिजे,” असे डॉ.विसपुते यांनी ठामपणे सांगितले. कार्यक्रमानिमित्त आत्महत्या प्रतिबंध दिनही साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी तरुणांमध्ये वाढत्या नैराश्याचा, मानसिक तणावाचा आणि आत्महत्येच्या घटनांचा गंभीर प्रश्न उपस्थित केला.
दारु अन् मोबाईल नवे संकट
“क्रॉस द वे” चित्रपटातील उदाहरण देत डॉ.विसपुते यांनी संवादाचे महत्त्व स्पष्ट केले. संवाद हा फक्त शब्दांचा नाही तर भावनांचा दुवा आहे. आपण स्वतःबद्दल जे काही बोलतो, विचार करतो तेच आपण घडवतो. सकारात्मक संवाद स्वतःवर विश्वास निर्माण करतो, असेही ते म्हणाले. दारू पिल्यामुळे होणाऱ्या लिव्हरच्या आजारांबरोबरच कौटुंबिक भांडणं, घटस्फोट आणि हिंसाचारही वाढतो, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळेही मानसिक आजार, एकाकीपणा, नातेसंबंधात तुटणं आणि व्यसनाधीनता वाढली आहे. सूत्रसंचालन प्रा. योगिता फालक तर आभार देवश्री सोनवणे यांनी मानले.