वारकरी संप्रदाय अन्‌ धर्म कार्यासाठी कटिबध्द

0
47

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

ग्रामीण भागात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तनकार मंडळी वारसा जपत आहे. मात्र, ग्रामीण भागात वारकरी साहित्याची उणीव भासत असल्याने वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे आणि वाढला पाहिजे. सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. नुसते वारकरी साहित्य वाटपापुरते नव्हे तर वारकरी संप्रदाय व धर्म कार्यासाठी नेहमीच कटिबध्द राहील, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत ह.भ.प. कैलास महाराज चोपडाईकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव आणि जळगाव तालुक्यातील ५७ भजनी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव व जळगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात ५७ गावांना भजनी साहित्य वाटप करण्यात आले. टप्प्याटप्याने मतदार संघातील प्रत्येक गावाला साहित्य वाटप होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीच्या महान पार्श्‍वभूमीवर साहित्य मिळाल्याने भजनी मंडळांनी आनंद व्यक्त केला.

जिल्हास्तरीय वारकरी भवन होणार असल्याने त्याचा भावी पिढीला फायदा होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. ती पूर्णत्वास येण्याचा मनस्वी आनंद आहे, असे सांगून ना.पाटील पुढे म्हणाले की, काही जण अशा कार्यक्रमावर टीका करतात. मात्र, अशा बदनामीला भिक घालत नाही. जिल्ह्यातील भजनी मंडळांना दर्जेदार साहित्य द्या, वारकरी संप्रदाय टिकेल कसा, असा प्रश्‍न निर्माण करीत जिल्ह्यात वारकरी संप्रदाय श्रीमंत कसा राहील, यासाठी प्रयत्न राहील. वारकरी मंडळींच्या कुटुंबात कोणी वारले तर त्या कुटुंबाला वारकरी मंडळातून आर्थिक मदत करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी ह.भ.प.गजानन महाराज यांनी तळागाळात वारकरी संप्रदाय रुजविण्याचे काम वारकरी करीत असतो. गुलाबभाऊंच्या माध्यमातून खान्देशाला उज्ज्वल नेतृत्व लाभले आहे. साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात टाळ, मृदृंगाचा आवाजाचे पुण्य त्यांना लाभणार असल्याचे श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्रचे अध्यक्ष तथा गौप्रेमी ह.भ.प.गजानन महाराज यांनी सांगितले. तसेच वारकरी संप्रदायाच्या परंपरा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शाळेचे चेअरमन विक्रम (विक्की) पाटील यांनी आभार मानले.

वारकरी भवनाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार !

वारकरी मंडळींसाठी वारकरी भवन उभारण्याचा मानस होता. आता जळगाव शहरातील खेडी परिसरात वारकरी भवनाच्या ६ कोटी ६ लाखांची मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की, संतांचा वारसा टिकविण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. फिरत्या कीर्तन सप्ताहात ५७ भजनी मंडळांना साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य वाटपात मापात पाप होणार नाही. साहित्य वाटपाचे महत्त्व विषद करून समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या वारकरी संप्रदायाला सदैव सहकार्य राहणार असल्याची ग्वाही प्रतापराव पाटील यांनी दिली. तसेच जळगाव ग्रामीणमध्ये कीर्तन सप्ताह असेल तर त्या कार्यक्रमाच्या पत्रिका मोफत छापून देण्याचे आश्‍वासन प्रतापराव पाटील यांनी दिले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे, ह.भ.प. देवगोपाल महाराज शास्त्री, ह.भ.प. बाबा परमहंस महाराज, ह.भ.प.चतुर्भुज महाराज धरणगावकर, ह.भ.प. भगवान बाबा धरणगावकर, ह.भ.प.पांडुरंग महाराज आवरकर, ह.भ.प.समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. शाम महाराज शास्त्री पिंपळगावकर, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज पाळधीकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर, ह.भ.प. प्रतिभा महाराज जवखेडेकर, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, धरणगाव तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, जनाआप्पा कोळी, पवन सोनवणे, जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सरपंच, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here