चाळीसगावला विधानसभेच्या निकालाची उत्सुकता शिगेला
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान दोन दिवसांपूर्वी पार पडले. गेली दीड-दोन महिने प्रत्येक उमेदवार निवडणुकीसाठी रात्रंदिवस मेहनत घेत होता. निवडणुकीचा निकाल शनिवारी, २३ तारखेला असल्याने मधले दोन दिवस बहुतांश उमेदवारांनी घरी राहणे, वैयक्तिक फोनवर संपर्क तसेच निकालाचा आढावा घेणे, थोडी विश्रांती करण्याला प्राधान्य दिलेले दिसून आले. मात्र, चाळीसगावाचे विद्यमान आमदार तथा भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण त्याला अपवाद ठरले आहे. मतदानानंतर दोन दिवस मिळालेल्या उसंतीचा उपयोग त्यांनी आपल्या सहकाऱ्याच्या कौटुंबिक आनंदात सहभागी होत आपले वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखित केले. सहकाऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आ. मंगेश चव्हाण यांनी मतदारसंघ सोडून ‘अमरावती’ गाठले आहे.
आ.मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात कार्यरत सागर शिंदे एका सहकाऱ्याला २१ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. शिंदे यांची सासरवाडी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे आहे. तिथेच त्यांच्या पत्नीची प्रसूती झाली. पती या नात्याने प्रसूतीच्या शेवटच्या महिन्यात पत्नीची काळजी घेणे आवश्यक होते. मात्र, निवडणुकीचा कालावधी व दिनांक २० रोजी मतदान असल्यामुळे आपल्याला शिंदे यांनी आपली जबाबदारीचे भान राखत आ.चव्हाण यांच्या निवडणूक प्रक्रियेत पूर्णवेळ सहभाग दिला. त्यांच्या निर्णयाला समजून घेत शिंदे यांच्या पत्नीने व कुटुंबियांनी साथ दिली. आपल्या सहकाऱ्याला कन्यारत्न प्राप्त झाल्याची बातमी कळताच आ.मंगेश चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले. ‘तू बॅग भरून तयार रहा, तुझ्या कन्येला पहायला आपल्याला अमरावती जायचे आहे’ असे सांगितले. रात्रीच अमरावती जिल्ह्यातील ४५० कि.मी. दूर चांदुर रेल्वे गाव गाठले.
आ. मंगेश चव्हाण ठरले आगळेवेगळे व्यक्तीमत्त्व
आपल्या मुलीला व नातीला पहायला आमदार स्वतः इतक्या लांब आले हे पाहून सर्व नातेवाईक भारावून गेले. स्थानिक महायुतीचे पदाधिकारी यांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठत आमदार चव्हाण यांची भेट घेतली. त्यांचा सत्कार केला. राजकारणात संवेदनशीलता व माणुसकी हरवत चालली असल्याची चर्चा नेहमी होत असते. माणसांचा वापर करा व गरज संपल्यावर सोडून द्या, अश्या प्रकारचा वाईट अनुभव मतदारसंघात काही लोकप्रतिनिधी यांच्याकडून आला असल्याचे अनेक उदाहरणे पहायला मिळतात. मात्र, निवडणूक प्रक्रिया संपल्यावर मिळालेल्या दोन दिवसांचा उपयोग आपल्या सहकाऱ्याच्या कौटुंबिक आनंदात सहभागी होत साजरा करणारे आ. मंगेश चव्हाण हे आगळेवेगळे व्यक्तीमत्त्व ठरले आहेत.