साईमत प्रतिनिधी
यंदाच्या हंगामात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला असताना, आता राज्यावर आणखी एक नवे हवामानशास्त्रीय संकट ओढावण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील तब्बल 14 जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट जारी केला असून पुढील 48 तास तापमानात लक्षणीय घसरण होणार असल्याचा इशारा दिला आहे.
राज्यात या वर्षी पावसाने भारी धुमाकूळ घातला. अतिवृष्टी, पुरस्थिती आणि वीजपर्जन्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगाम बुडाला, नदीकाठच्या खेड्यांमध्ये पुराचे पाणी घरे-गोठे वाहून घेऊन गेले. अवकाळी पावसाचा फटका राज्याला सातत्याने बसतच राहिला. पावसाचा तडाखा ओसरला, तरी आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे तापमानात झपाट्याने घसरण अपेक्षित आहे.
थंडीचा कडाका वाढणार; तापमान सरासरीपेक्षा कमी
IMD च्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील तापमान हे साधारण हंगामी तापमानापेक्षा कमी राहणार आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याने राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागातील वैज्ञानिक सुषमा नायर यांनी याबाबत माहिती देत राज्यातील अनेक भागांनी विशेष सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली.
या 14 जिल्ह्यांना IMD चा येलो अलर्ट
मराठवाडा
-
जालना
-
परभणी
-
बीड
-
नांदेड
-
लातूर
विदर्भ
-
गोंदिया
-
नागपूर
उत्तर महाराष्ट्र
-
नाशिक
-
धुळे
-
नंदुरबार
-
जळगाव
-
अहमदनगर
पश्चिम महाराष्ट्र
-
पुणे
-
सोलापूर
वरील सर्व जिल्ह्यांमध्ये रात्रीचं तापमान मोठ्या प्रमाणात घसरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
हवामान विभागाने विशेष सतर्कता सुचवताना श्वसनाचा त्रास असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अचानक वाढणारी थंडी आणि कोरडे वातावरण यांचा फुफ्फुसाच्या आजारांवर परिणाम होऊ शकतो, असा विभागाचा इशारा आहे.
त्याचबरोबर पुढील काही दिवस उत्तर भारतासह महाराष्ट्रातही थंडीचा कडाका कायम राहील. ग्रामीण भागात सकाळी धुके व दिवसाढवळ्या थंडगार वारे जाणवण्याची शक्यता आहे.
थंडीची चाहूल, राज्य गारठणार
पावसाच्या तडाख्यानंतर आता हिमालयातून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी महाराष्ट्र गारठण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. तापमानातील घसरण आणि थंडीची लाट यांमुळे नागरिकांनी स्वतःची आणि वृद्धांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पुढील 48 तास हवामानातील बदल अधिक ठळक जाणवणार असल्याने प्रशासनानेही सतर्कता वाढवली आहे.
