तीस मिनिटात ‘होत्याचे नव्हते’ झाले; खटकाळी नदीला ‘महापूर’
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
घोसलासह शिवारात सोमवारी, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अचानक तीस मिनिटाच्या पावसाने दाणादाण उडवून दिली. तीस मिनिटात ढगफुटी सदृश पावसाने ‘होत्याचे नव्हते’ झाले. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात वाचवून जगविलेले पिकांची ढगफुटी सदृश पावसामुळे नुकसान झाले आहे.
सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारावर अचानक सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने घोसला गावाच्या खटकाळी नदीला ‘महापूर’ आल्यामुळे सोयगाव-बनोटी रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. पूराच्या पाण्याने सायंकाळी थैमान घातले होते. रात्री उशिरापर्यंत घोसला शिवारात आपत्तीग्रस्त स्थिती उद्भवली होती. मात्र, महसुलचे आपत्ती निवारण पथक गायब होते. त्यामुळे पूरग्रस्त स्थितीत ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना जीव मुठीत घेत रहावे लागले होते.
ढगफुटी पावसाबाबत व्यक्त होतेय आश्चर्य
तालुक्यात पावसाचा थेंबही पडलेला नाही. अशातच घोसला शिवारावर अचानक ढगफुटी पाऊस झाला. ढगफुटी पावसाची नोंद केवळ गावावर झाली. सोयगाव तालुक्यातील कोणत्याही गावात पाऊस झालेला नाही. त्यामुळे ढगफुटी पावसाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.