जागतिक वारसा सप्ताहानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
देशभर १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान दरवर्षी जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो. त्यात पुरातन वास्तु, स्थळे, मंदिरे, गड किल्ले, लेण्या अशा अनेक पुरातन वारसांच्याबाबत त्यांचे जतन, साफसफाई व ऐतिहासिक महत्त्व याबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान, चाळीसगावच्यावतीने २४ नोव्हेंबर रोजी गौताळा अभयारण्यातील अत्यंत पुरातन असलेल्या सीतान्हाणी (पाणपोई) वास्तूची स्वच्छता करण्यात आली. संपूर्ण वास्तूवर वाढलेले मोठमोठाले गवत, वेली, काटेरी झुडपे काढून तिला मोकळे करण्यात आले. गवत आणि काटेरी झुडपांमध्ये लुप्त होत असलेल्या वास्तूस मोकळा श्वास मिळाला आहे.
पुरातन वास्तूला ‘पाणपोई’ असे म्हटले जाते. हेमाडपंथी मंदिरासारख्या आकारात उभ्या असलेल्या वास्तूमध्ये दोन मोठमोठी पाण्याची रांजणे आहे. त्यात येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत होते. सायगव्हाणजवळील भिलदरीजवळील खान्देशातून मराठवाड्यामध्ये जाण्यासाठीच्या पुरातन व्यापारी मार्गावर ही वास्तू असल्याने पाण्याचा उपयोग त्यावेळी मोठ्या प्रमाणात होत असावा. आज या वास्तूची संपूर्णपणे स्वच्छता करून सह्याद्री प्रतिष्ठानने पुन्हा एकदा वास्तूस नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे.
यांची लाभली उपस्थिती
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा प्रशासक गजानन मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, संजय साठे, गणेश पाटील, जितेंद्र वाघ, बाळासाहेब सोनवणे, नाना चौधरी, भाऊसाहेब पाटील, जितेंद्र वरखेडे, संजय पवार, पहेलवान सचिन पाटील, संभाजी पाटील, ललित चौधरी, शेखर आगोणे, ललित अण्णा चौधरी, गोरख वाघ, उमेश खेडकर, आदी उपस्थित होते.