साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
संत निरंकारी मिशनच्यावतीने (रजि. दिल्ली) सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु बाबा हरदेवसिंगजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त गुरुपूजा दिवसाचे औचित्य साधून रविवारी, २५ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेत चाळीसगाव शाखेच्यावतीने पाटणादेवी परिसरात स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला.
अवघ्या भारतवर्षात अशी परियोजना जवळपास १ हजार ५०० पेक्षा अधिक ठिकाणी २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९०० शहरांमध्ये एकाचवेळी राबविण्यात आली. परियोजनेचा मुख्य उद्देश जलसाठ्यांचे संरक्षण, त्यांची स्वच्छता व जनसामान्यांमध्ये याविषयी जागरूकता अभियान राबवून त्यांना प्रोत्साहित करणे आहे. संत निरंकारी मिशन सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांमध्ये निरंतर आपली सक्रिय भूमिका बजावत वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, तलासरी बांध परियोजना, वननेस वन, पर्यावरणीय मुद्यांबाबत जागरूकता यांसारख्या योजनांना कार्यान्वित करुन संचलित करत आहे. निःसंदेह मिशनच्या अशा कल्याणकारी योजना पर्यावरण संरक्षण व धरतीला सुंदर बनविण्यासाठी एक प्रशंसनीय व स्तुत्य पाऊल आहे. ज्यावर अंमलबजावणी करुन जमीनीला अधिक स्वच्छ, निर्मळ व सुंदर बनविले जाऊ शकते.
पाटणादेवी नदी परिसरात अभियानाची सुरुवात करण्याअगोदर चाळीसगाव ब्रांचमुखी आ.झुलेलाल पंजाबी यांनी सर्वांना आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वच्छता अभियानद्वारा वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या नदी परिसरातील संपूर्ण कचरा संकलन करून वनविभागाचे अधिकारी अशोक मोरे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी संत निरंकारी मंडळ, चाळीसगाव शाखेचे आ. झुलेलाल पंजाबी, अकाउंटंट आ. जयसिंग पाटील, कॅशियर आ. बाबाजी कवडे, सेवादल संचालक सतिष भालेराव, महिला सेवादल इन्चार्ज आ.मनिषा मराठे, सेवादल शिक्षक आ. ईश्वर कुमावत तसेच आसपासच्या परिसरातील सर्व सेवादल, साथसंगतचे ७०-७५ महात्मा बहनजींनी सहभाग नोंदविला. शेवटी ब्रांच मुखी झुलेलाल पंजाबी यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.