साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथे अयोध्येत होणाऱ्या प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून तीर्थक्षेत्र असलेल्या श्री गुरुदेव दत्त मंदिर आणि तिन्ही गावांच्या परिसरात कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेतून मंदिर आणि आजूबाजूचा परिसरही स्वच्छ करून चकाचक करण्यात आला. त्यामुळे स्वच्छता अभियानाचे भाविकांमधून स्वागत होत आहे. तसेच परिसर स्वच्छ केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री गुरुदेव दत्त मंदिर, श्री चमत्कारी शनी मंदिर, महादेव मंदिराच्या परिसरात तसेच मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेत
कै.सु.आ.पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळेचे मुख्याध्यापक अशोक देसले, सर्व शिक्षक, कर्मचारी, गावातील सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील, लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
