साईमत, जळगाव : प्रतिनिधी
स्वच्छता पंधरवडा अंतर्गत मनपा आणि व.वा.म्युन्सिपल मार्केट(गोलाणी मार्केट) येथे प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या अधिपत्याखाली १८ अधिकारी वर्गाच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाकडील मुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक युनिट प्रमुख व मुकादम यांच्याकडून समन्वय करून ३०५ कामगारांकडून नुकतीच विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
गोलाणी मार्केटची स्वच्छता मोहीम ही विंग क्रमांक १ ते ४ वर आणि आजूबाजूचा मार्केटचा परिसर रस्ते साफसफाई मोहिमेत करण्यात आली. यावेळी प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी स्वतः हजर राहून मोहीम राबविली. यावेळी सह. आयुक्त गणेश चाटे, सहआयुक्त (आरोग्य) उदय पाटील, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्यासह सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.
विशेष मोहिमेद्वारे मार्केटमधील गोळा केलेल्या कचरा संकलनाच्या ३३ ट्रीप वाहनाद्वारे वाहण्यात आल्या. त्याचे वजन ७७.८५ एमटी इतकी आहे. अजूनही साफसफाईद्वारे मार्केटवरील गच्चीवर संकलित केलेला कचरा पडून आहे. त्याच्या विल्हेवाटीचे उर्वरित काम हे मंगळवारी, २६ सप्टेंबर रोजी मनपा प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त (आरोग्य) उदय पाटील यांनी सांगितले.