आकाशवाणी चौक, इच्छादेवी, अजिंठा चौफुली परिसरातील ‘अस्वच्छते’कडे वेधले लक्ष
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी सर्कल आणि अजिंठा चौफुली सर्कल अशा प्रमुख परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे आणि जंगली झाडे वाढल्यामुळे परिसर अतिशय अस्वच्छ आणि विद्रूप झाला आहे. याठिकाणाची दुरवस्था लक्षात घेऊन जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही) यांना निवेदन देत तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यामुळे याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने साफसफाईचे काम करावे, अशी नागरिकांनीही अपेक्षा व्यक्त केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील आकाशवाणी चौक हा प्रमुख आणि गर्दीचा भाग आहे. या मार्गावरून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि नागरिकांची सतत वर्दळ सुरु असते. अशा महत्त्वाच्या चौकाचा विद्रूप झालेला परिसर शहराच्या सौंदर्याला डाग लावणारा आहे. मनसेने पुढील तीन दिवसात परिसर स्वच्छ न झाल्यास प्रतीकात्मक निषेध म्हणून सर्कलमध्ये बकऱ्या चारल्या जातील, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी यांनी स्पष्ट केले की, हा महामार्ग शहराच्या बाहेरील असल्याने सर्कल परिसराची साफसफाई ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सविस्तर पत्र देण्यात येईल.
याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, ॲड. सागर शिंपी, विकास पाथरे, विभाग अध्यक्ष दीपक राठोड उपस्थित होते.



