साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ सोमवारी, ९ ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडी आणि त्रस्त नागरिक आघाडीतर्फे जि.प.च्या विश्रामगृहापासून सकाळी ११ वाजता नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
अमळनेरात सध्या प्रशासक राज सुरू आहे. त्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. त्यात प्रामुख्याने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे पडल्याने यावरून ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. खड्डयात रस्ते आहेत की, रस्त्यात खड्डे? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. शहरातील गटारींची दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अद्यापही भुयारी गटारी पूर्ण केलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी गटारीच नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन त्रास होत आहे. इतर अन्य समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. त्यात तापीला विपुल पाणी असले तरी शहरात पाण्याचा ठणठणाट आहे. नियोजन नसल्यानेच हा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढलेला असला तरी याकडे कुणी लक्ष देण्यास तयार नाही. अनेक भागांमधील पथदिवे बंद असल्याने अमळनेरकांना अंधारातूनच ये-जा करावी लागते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.
मूलभूत नागरी सुविधांकडे दुर्लक्ष
अमळनेरकरांना मोठ्या प्रमाणात असुविधा होत असतांनाही नगरपालिका प्रशासन सुस्त आहे. मंत्रीही याबाबत काहीही कार्यवाही करण्यास तयार नाहीत. मूलभूत नागरी सुविधांकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. गावात डुकरे, कुत्रे ह्यांचा सुळसुळाट आहे. उघड्यावर मास, माशांची विक्री केली जाते. अनेक कॉलनीमध्ये दिवाबत्ती गुल असते. मोर्चात नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आ.डॉ. बी. एस. पाटील, नागरी समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्याम पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख सूरज परदेशी, आपचे अध्यक्ष संतोष पाटील, बीआरएसचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केले आहे.