महसूल सप्ताहातंर्गंत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रकार परिषदेत आवाहन
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
जिल्ह्याच्या महसूल विभागाशी निगडीत नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्याचबरोबर महसूल विभागाचा कारभार अधिकाधिक पारदर्शक करण्याचा जिल्हा प्रशासनाने कसोशीने प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेत रस्ते, जीवंत सातबारा, शेतजमीन तुकडे बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी, घरकुलांसाठी जागा उपलब्ध करुन देणे, रेशनकार्ड, ऑनलाईन सेवा कलेक्टर ऑफीस तुमच्या (नागरिक) पॉकेटमध्ये आदी नाविन्यपूर्ण उपक्रम, सुविधा राबविण्यात आम्ही कुठेही मागे राहिलो नाहीत तर ऑनलाईन सेवेच्या बाबतीत आम्ही राज्यात आघाडीवर असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. त्यांनी गुरुवारी, ३१ जुलै रोजी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हा प्रशासनातर्फे १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहाचे महत्त्व आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या सेवा, सुविधांची माहितीही त्यांनी सविस्तर दिली. दरम्यान, जिल्ह्याभरात साजरा करण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने महसुली सेवांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सप्ताहाचा प्रारंभ होणार आहे. सप्ताहाच्या अनुषंगाने महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार वितरणाचा मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे.
१८ हजार तुकड्यांची सातबारा उताऱ्यावर नोंद
जिल्हाधिकारी प्रसाद पुढे म्हणाले की, नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च टाळता यावा, म्हणून महसूल विभागाच्या सर्वच सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तेव्हा पात्र नागरिकांनी आपल्या मोबाईल, लॅपटॉप, संगणकाच्या सहाय्याने अर्ज सादर करु शकतात. त्यासाठी जिल्हाधिकारी, तहसील अथवा प्रांत कार्यालयात येण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. जमीन तुकडे बंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्ह्याने केली आहे. जवळपास १८ हजार तुकड्यांची सातबारा उताऱ्यावर आतापर्यंत नोंद केली आहे, ही फार मोठी उपलब्धी असल्याचेही त्यांनी सांगितले.
            


