एलसीबीची कारवाई, पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ उभ्या असलेल्या एका महेंद्र पिकअप वाहनातून ४ लाख २ हजार रुपये किमतीच्या सिगारेटची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा जळगाव शहर पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पुणे येथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या कबुलीवरून आणखी दोन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. चोरट्यांनी चोरलेल्या सिगारेट विकून मिळालेले ३ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी, ४ जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप येथे चंद्रशेखर जवरीलाल राका (वय ५०, रा. नवीपेठ जळगाव) यांच्या मालकीचे उभ्या असलेल्या पिकअप वाहनाचे कुलूप तोडून सिगारेट चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरविली. तपासात सागर राजू घोडके (वय २८, रा. चिंचवड, पुणे) याचा चोरीत सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला पुणे येथून अटक केली.
सिगारेट विक्रीतून मिळालेले ३ लाख रुपये जप्त
चौकशीवेळी सागर घोडकेने ही चोरी अभिजीत उर्फ कुबड्या तुलसीदास विटकर (वय २५), काशीद अलीमुद्दीन अन्सारी (वय २२) आणि आकाश उर्फ बंटी भवारसिंग राजपूत (वय २३, तिघेही रा. चिंचवड, पुणे) यांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी चौघांपैकी तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सिगारेट विक्रीतून मिळालेले ३ लाख रुपये जप्त केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.