चोसाका कामगारांच्या थकीत वेतनासह अंतिम रक्कम लवकर द्यावी,

0
77

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत वेतन आणि उर्वरित राहिलेल्या सर्व रकमा एकरकमी व लवकर मिळाव्यात, उपोषण करूनही तोंडाला पाने पुसली म्हणून आता कुणावर विश्‍वास ठेवायचा? यावर सर्व कामगारांनी एक मताने असे ठरविले की, रविवारी, ३ डिसेंबरपासून साखर कारखान्याचा काटा बंद आंदोलन सुरू करणार आहेत. अशा आशयाचे निवेदन कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, बारामती ॲग्रो, चोसाकाचे अध्यक्ष यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सर्व कामगारांनी थकीत वेतन व अंतिम एकूण रक्कम मिळावी, यासाठी आमरण उपोषण केले. दिलेल्या शब्दावर विश्‍वास ठेवून उपोषण मागे घेतले. त्यावेळी रकमा दिवाळीला मिळतील असे सांगून वेळ मारून नेली. मात्र, आमची दिवाळी अंधारात गेली. आजपर्यंत कोणत्याही रकमा मिळाल्या नाहीत. चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा बारामती ॲग्रो यांना भाडेतत्त्वावर घेतांना बारामती ॲग्रो यांनी मान्य केलेले आहे की, बारामती ॲग्रो कंपनी युनिट ४ कर्मचाऱ्यांची संपूर्ण थकीत पगाराची रक्कम, कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी भरणा, कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात झालेली विम्याची रक्कम, मयत कर्मचाऱ्यांच्या मयत निधी, शेतकऱ्यांची थकित पेमेंट अशा अनेक प्रकारच्या रकमांची देणे बारामती ॲग्रो स्वतः करण्याची ग्वाही अटी व शर्ती मान्य करूनच चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा भाडे तत्त्वावर दिलेला आहे. रकमा देण्यास चोसाका संचालक मंडळासह बारामती ॲग्रोही तेवढीच जबाबदार आहे.

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व बारामती ॲग्रो यांना सर्व कामगारांनी एकमताने ठरविल्याप्रमाणे असे आंदोलन होऊ नये, कारखाना बंद पडू नये, असे वाटत असेल तर थकीत पगार व अंतिम सर्व संपूर्ण रक्कम ही एक रक्कम देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. निवेदनावर राष्ट्रीय साखर कामगार संघ (ई.प्र.) अध्यक्ष भागवत मोरे, उपाध्यक्ष विश्‍वनाथ सोनवणे, सचिव सुनील पाटील, सहसचिव रामकृष्ण पाटील, धोंडू पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here