चैतन्यधामला आयोजित बालसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
बालपण हे जीवनाचा पाया असतो आणि त्या वयात मुलांच्या मनावर जे संस्कार होतात. त्यावर त्यांच्या पुढील आयुष्याचा संपूर्ण प्रवास ठरतो. बालसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची दिशा मिळत असल्याचे मत गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे गादीपती प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी व्यक्त केले. ते जामनेर तालुक्यातील होळहवेली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चैतन्यधाम येथे आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, बालसंस्कार शिबिर म्हणजे मुलांना योग्य दिशा देणारे, जीवनमूल्य शिकवणारे आणि सदगुणांचे बीजारोपण होणारे एक पवित्र साधन आहे. आजची पिढी संस्कार आणि संस्कृती विसरून विकृतीकडे जात आहे. त्यामुळे धावपळीच्या जीवनात पालकांनी आपला अमूल्य वेळ काढून मुलांना चांगले संस्कार देण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात मुले सक्षम होऊ शकणार नाहीत, असेही ते म्हणाले.
निसर्गरम्य वातावरणात घेतलेल्या शिबिरात विद्यार्थ्यांनी दिवसभर मनसोक्त आनंद घेतला. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.