
मायमाती फाउंडेशनचा ‘वाचन–गप्पांचा’ अभिनव उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील ममुराबादजवळील धामणगावातील कै. बाबडू सुपडू सपकाळे माध्यमिक विद्यालयात ‘बालदिन’ नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. मायमाती फाउंडेशन संचलित ‘गंमत जोडशब्दांची रिडिंग अँड लर्निंग सेंटर’ तर्फे कट्ट्यावरच्या गप्पा पुस्तक मेळावा “पुस्तकातून ज्ञान घेऊन, गप्पांमधून व्यक्त होऊ” असा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यालयाच्या आवारात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिवंत पुस्तकालय उभे करण्यात आले. तब्बल दहा विषयाधारित कॉर्नर सजवून विद्यार्थ्यांना विविध साहित्य जगताचा प्रवास घडविण्यात आला. गोष्टी, चित्र पुस्तके, कविता, माहितीपूर्ण साहित्य, कुल्की मासिक, गरवारे बालभवनची पुस्तके यांसह ज्योत्स्ना प्रकाशन आणि प्रथम बुक्स यांच्या दर्जेदार साहित्याचा समावेश होता. उपक्रमात प्रभावती पाटील यांनी उपस्थित सर्व पुस्तकांची ओळख विद्यार्थ्यांना सोप्या व रंजक पद्धतीने करून दिली. उपक्रमासाठी मायमाती फाउंडेशनच्या प्रभावती पाटील आणि जयमाला फिरके यांनी परिश्रम घेतले.
बालदिन समारंभाच्या समारोपाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या अध्यक्षा संगीता सपकाळे होत्या. याप्रसंगी विशेष पाहुणे म्हणून स्व. देवराम खुशाल पाटील फाउंडेशनचे उपाध्यक्ष इंजि. साहेबराव पाटील उपस्थित होते. त्यांच्या फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना पं. जवाहरलाल नेहरू यांची पुस्तके, चित्र रंगवा पुस्तके आणि रंगीत पेन्सिल बॉक्सचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नेहरूंच्या पुस्तकांचे प्रतिकात्मक वाचनही सादर केले. त्यांनी बालदिनाचे महत्व सांगत विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधला. कार्यक्रमाला मायमाती फाउंडेशनच्या सदस्यांसह विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. बालदिनाचे औचित्य साधून शालेय वातावरणात वाचन, सर्जनशीलता आणि ज्ञानाची मुक्त देवाणघेवाण घडवून आणणारा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला. प्रास्ताविक नितीन लाठी तर मुख्याध्यापक हेमेंद्र सपकाळे यांनी आभार मानले.


