महात्मा जोतिराव फुले पुण्यतिथीनिमित्त राबविला उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
तालुक्यातील आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालसभेचे आयोजन केले होते. बालसभेच्या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. अध्यक्षस्थानी इयत्ता सहावी ‘अ’ची विद्यार्थिनी विशाखा भोळे होती. मंचावर मान्यवर सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन, सचिव विलास चौधरी, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाची अध्यक्ष विशाखा भोळे हिने तिच्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प करू या, असे सांगितले. तसेच आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी प्रयत्न करू या. हेच आपल्याकडून महात्मा फुले यांना खरे अभिवादन ठरेल, असेही सांगितले.
याप्रसंगी छायेंद्र पाटील, स्नेहा खोडपे, हर्षा पाटील,गायत्री घुले या विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन विशाखा पाटील, वैष्णवी मोरे तर आभार लावण्या शिंपी हिने मानले.