साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्त्रोने सूर्यांकडे झेपावणाऱ्या आदित्य एल-१ चे यशस्वी प्रेक्षपण केले. संपूर्ण देशासाठी हे अभिमानास्पद आहे. याबद्दल येथील व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इस्त्रोच्या टीमचे पोस्टकार्ड पाठवून अभिनंदन केले. मंगळवारी अशी पत्रे बंगळरु येथे पाठविण्यात आली आहेत.
मोबाईलमुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी होत आहे. चांगले हस्ताक्षर हा व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. लेखन सरावासोबतच सामान्यज्ञान, देशाभिमान बालवयातच वाढीस लागावा, यासाठी वर्गशिक्षक जिजाबराव वाघ यांनी पत्रलेखनाचा विद्यार्थ्यांना सराव दिला. २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्वतःच्या हाताने ‘चंद्र आणि सूर्यपूत्रांनो आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे…’ अशा शब्दात इस्त्रो टीमचे अभिनंदन केले. पत्रे लिहून त्यांना रंगसंगतीसह सुबक सजविले. यावेळी मुख्याध्यापिका मंजुषा नानकर यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतांना वर्गशिक्षक वाघ यांचेही कौतुक केले. यावेळी उपशिक्षक अजयराव सोमवंशी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी त्रिशला निकम, राजश्री शेलार, अनिल महाजन, मनिषा सैंदाणे, शर्वरी देशमुख, सचिन चव्हाण, प्रशांत महाजन, स्मिता अमृतकार, दिपाली चौधरी, ज्योती कुमावत, कविता साळुंखे, रेखा चौधरी, सचिन पाखले, दत्तात्रय गवळी, रोहित चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
कबूतर ते मोबाईल क्रांती
पूर्वी संदेश पाठविण्यासाठी कबूतरांना प्रशिक्षण देऊन तयार केले जात होते. त्यानंतर पोस्टाने अमुलाग्र बदल करीत संदेशवहन सुलभ केले. सद्यस्थितीत मोबाईल व इंटरनेट क्रांतीमुळे पोस्टकार्ड अडगळीत पडल्यासारखे झाले आहे. संदेश देवाण-घेवाण क्रांतीचे हे टप्पेही विद्यार्थ्यांनी पत्रलेखन करतांना समजून घेतले. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या पालकांना सोबत घेऊन पोस्ट कार्यालयात पत्रपेटीत लिहिलेली पोस्टकार्ड टाकली. त्याची सेल्फी काढत आनंद साजरा केला.
यांनी केले कौतुक
याबद्दल नारायणदास अग्रवाल, रामकृष्ण पाटील, मिलिंद देशमुख, डॉ. विनोद कोतकर, योगेश अग्रवाल, सुरेश स्वार, ॲड. प्रदीप अहिरराव, भोजराज पुन्शी, अशोक बागड, नीलेश छोरिया आदी पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.