मुंबई :
भारतीय संघापासून बराच काळ दूर असलेला पृथ्वी शॉ फॉर्मच्या शोधात इंग्लंडला पोहोचला. रॉयल लंडन वन डे कपमध्ये दोन मोठी शतके झळकावली. मात्र चार सामन्यांनंतर नशिबाने पुन्हा एकदा दगा दिला. क्षेत्ररक्षण करताना गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे पृथ्वी केवळ स्पर्धेतून बाहेरच नाही तर पुढील काही महिने मैदानापासूनही दूर राहणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे वादात सापडलेल्या पृथ्वीसाठी ही बातमी प्रचंड धक्कादायक होती. अशा परिस्थितीत आता त्याचा बालपणीचा मित्र आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने एक मन जिंकणारी पोस्ट टाकली आहे.
अर्जुनने त्याचा बालपणीचा मित्र पृथ्वी शॉचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून मित्राला प्रोत्साहन दिले. तसेच पृथ्वी शॉला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देताना अर्जुन तेंडुलकरने इन्स्टा स्टोरीवर लिहितो, “मित्रा खंबीर रहा, तू लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छ!” पृथ्वी शॉने एकदिवसीय चषक २०२३ मध्ये सॉमरसेटविरुद्ध २४४ धावांची शानदार खेळी केली होती आणि याच खेळीच्या जोरावर तो पुन्हा चर्चेत आला होता. चार डावांत ४२९ धावा करून तो अजूनही स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉ जवळपास दोन महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर असेल आणि उपचारांच्या काही आठवड्यांनंतर तो भारतात परतेल.
नॉर्थम्प्टनशायरचे मुख्य प्रशिक्षक जॉन सॅडलर यांनी देखील पृथ्वी शॉच्या जबरदस्त कामगिरीचे कौतुक केले होते आणि दुर्दैवी दुखापतीबद्दल निराशाही व्यक्त केली. याबाबतीत बोलताना ते म्हणाले, “ पृथ्वीने त्याच्या छोट्या कारकिर्दीत एक क्लबकडून खेळताना आमच्यावर खूप मोठा प्रभाव पाडला आहे. ही एक मोठी दु:खद गोष्ट आहे की तो या स्पर्धेच्या उर्वरित सामन्यात आमच्यासोबत राहणार नाही. तो एक अत्यंत नम्र आणि कृतज्ञ युवा खेळाडू आहे नॉर्थॅम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याने जी कामगिरी केली त्यासाठी आम्ही त्याचे सदैव ऋणी राहू.”
क्लबने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे सूचित केले आहे की, “पृथ्वी शॉ शुक्रवारी लंडनमध्ये एका वैद्यकीय विशेषज्ञला भेटेल. त्याच्यावर होणार वैद्यकीय उपचार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मार्गदर्शनाखाली होणार असून त्यावर आमचे बारीक लक्ष असणार आहे. २३ वर्षीय पृथ्वी शॉला भारतासाठी पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान, त्याने अनुक्रमे ३३९ आणि १८९ धावा केल्या आहेत, तर त्याला टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नाही.