साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ १७ वर्षीय मुलीचा विवाह करून तिला गर्भवती केले आणि नुकतीच तिने बाळाला जन्म दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. या गंभीर गुन्ह्यात मुलीच्या पतीसह तिचे आई-वडील, सासू-सासरे, मामा आणि विवाह लावणारे असे एकूण दहा जणांविरुद्ध पोलिसांनी कठोर गुन्हे नोंदवले आहेत. मुलीच्या पतीला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
ही अल्पवयीन मुलगी अलीकडेच प्रसूतीसाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाली होती. प्रसूती झाल्यानंतर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांच्या लक्षात मुलीचे वय केवळ १७ वर्ष असल्याचे आले. तत्काळ त्यांनी याबाबतची माहिती जळगाव तालुका पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय पाटील व देविदास चिंचोरे यांनी चौकशीला वेग दिला. तपासादरम्यान रुग्णालयातील कागदपत्रांबरोबरच मुलगी शिकत असलेल्या शाळेतील जन्मनोंद तपासण्यात आली. दोन्ही ठिकाणच्या नोंदीत मुलीचे वय १७ वर्ष असल्याचे स्पष्ट झाल्याने हा बालविवाह असल्याची खात्री पटली.
चौकशीत असेही उघड झाले की, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी १५ मार्च २०२४ रोजी चोपडा तालुक्यातील एका तरुणासोबत तिचा विवाह लावला होता. कायद्यानुसार मुलीचे किमान विवाहयोग्य वय १८ वर्ष असताना, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हा बेकायदेशीर विवाह करण्यात आला. लग्नानंतर मुलगी गर्भवती राहिली आणि अलीकडेच तिने बाळाला जन्म दिला.
या गंभीर प्रकाराची नोंद घेऊन पोलिसांनी स्वतः फिर्यादी बनत ८ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल केला. मुलीचा पती, सासू, सासरे, आई-वडील, मामा आणि विवाहास जबाबदार इतर नातेवाईक अशी एकूण १० जणांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे स्पष्ट उल्लंघन केल्याने सर्व आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
अल्पवयीन मुलींचा विवाह हा गंभीर सामाजिक गुन्हा असून, त्याचे परिणाम आयुष्यभर सोसावे लागू शकतात. त्यामुळे अशा प्रकरणांवर पोलिसांची तातडीची कारवाई ही निश्चितच धोक्याची घंटा आहे.
