House Collapsed Due To Heavy Rain ; पाचोऱ्यात अतिवृष्टीमुळे घर कोसळले बालकाचा मृत्यू, दुसरा जखमी

0
16

मृत महेश हा विधवा आईचा एकुलता एक मुलगा ; न. पा. चे मुख्याधिकारी, तहसीलदार, तलाठी आदींनी दिली भेट

साईमत/पाचोरा /प्रतिनिधी :

अतिवृष्ठीमुळे शहरातिल कृष्णापुरी भागातिल टेकडीगल्लीत धाब्याचे घर अतिवृष्ठीमुळे कोसळल्याने एक १२ वर्षाचा मुलगा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावला तर दुसरा मुलगा जखमी झाला. मरण पावलेला महेश हा विधवा आईचा एकुलता एक मुलगा असून तिच्या वृध्दपकाळाची काठी हरपल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महेश नितिन राणे (वय १२) असे मयत झालेल्या बालकाचे तर योगेश बाळू पाटील असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, विठ्ठल काशिनाथ पाटील हे आपल्या मुलासह धाब्याच्या घरात राहत होते. घराच्या मागच्या बाजूस महेश आणि त्याचा मावसभाऊ योगेश झोपले होते. घरातील इतर सदस्य पुढच्या भागात बसलेले होते. दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास घराच्या मागचा भाग कोसळल्याने जोरदार खळबळ उडाली. विठ्ठल पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ गल्लीतील नागरिकांना बोलावून पडलेली माती व लाकडे बाजूला करण्यास सुरुवात केली. या प्रयत्ना दरम्यान महेश आणि योगेश यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना त्वरित ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी महेश राणे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर योगेश पाटील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, गेल्या २० दिवसांपासून सतत पावसामुळे जमिनीत साचलेले पाणी आणि ढिगाऱ्यांवरील ओलसरपण घर कोसळण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, तहसीलदार विजय बनसोडे, तलाठी श्रीमती चौधरी, पोलीस निरीक्षक राहूल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकम, माजी नगरसेवक विकास पाटील, किशोर बारवकर, अनिल येवले, भोला पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले. मृत महेश राणे याच्या वडिलांचे निधन झालेले असून, तो आई आणि दोन बहिणींसह चाळिसगाव तालुक्यातील लोंढे येथे राहत होता. बालकाला शिक्षणासाठी वडिल व भावाकडे राहण्यास पाठवले होते.

या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, तालुक्यातील पावसामुळे येणाऱ्या धोका आणि घरांच्या टिकाऊपणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पावसाळ्यात घरांची तपासणी करून सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here