जळगाव बालरंगभूमी परिषद शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी दिली माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
संपूर्ण भारतात मराठी बालरंगभूमीची समृध्द परंपरा आहे.मराठी बालनाट्यालाही ६६ वर्षांची समृध्द परंपरा लाभली आहे. मराठी बालनाट्यांचे सर्वात जास्त प्रयोग महाराष्ट्रात होतात. २ ऑगस्ट १९५९ रोजी पहिल्या व्यावसायिक बालनाट्याचा प्रयोग झाला होता. त्यामुळे बालरंगभूमी परिषदेतर्फे शनिवारी, २ ऑगस्ट हा ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याची माहिती जळगाव बालरंगभूमी परिषद शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी दिली.
बालरंगभूमी परिषद अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था आहे. संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये मराठी बालनाट्य दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्यात २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात नटराज व रंगमंच पूजन, नाट्यछटा, स्वगत सादरीकरण त्यानंतर नाट्यगृहापासून काव्य रत्नावली चौकापर्यंत बालनाट्य दिंडीचे आयोजन केले आहे.
बालकलावंतांचा हक्काचा दिवस उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन
उपक्रमाला शहरातील बालक, बालकलावंत, पालक, शिक्षक, बालप्रेक्षक व रंगकर्मींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालकलावंतांचा हक्काचा दिवस उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद शाखेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, अमोल ठाकूर, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, सुदर्शन पाटील, पंकज बारी, दीपक महाजन, हर्षल पवार, मोहित पाटील, सुरेखा मराठे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.