साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (२०सप्टेंबर) मुक्ताईनगर येथे दौरा आहे. त्यांच्या स्वागतासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांचा मेळवा घेऊन ते संवाद साधणार आहेत. शिंदे हे त्यांच्या समर्थाकांना भेटून तिथली स्थानिक राजकीय समीकरणे जाणून घेणार आहेत. तसेच पुढील आगामी निवडणुकांसाठी राजकीय समीकरणे काय असायला हवीत यांच्याबद्दल ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. स्थानिक निवडणूक जिंकण्याची रणनीती काय असणार, याबाबत स्थानिक नेत्यांशी बातचीत करणार आहेत. त्यांचा हा दौरा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात येत असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. दौऱ्याच्या नियोजनासाठी शिंदे गटाच्या आमदारांची फलकबाजी दिसून येत आहे. राज्यात ज्याप्रमाणे शिंदेंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे जळगावातसुद्धा प्रतिसाद मिळावा यासाठी अनेकांची उत्सुकता दिसून येत आहे.