संभाजीनगरात मंत्रिमंडळाची शाही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोडली परंपरा

0
14

संभाजीनगर : वृतसंस्था

राज्य मंत्रिमंडळाची उद्या शनिवारी येथे होत आहे. बैठकीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून यंत्रणेची लगबग सुरु आहे. वाहन,हॉटेल्स,विश्रामगृहे आरक्षित करण्यात आली आहे. दरम्यान, या तयारीसाठी शासकीय अधिकाऱ्यांचे बैठक सत्रही सुरु होते. मंत्रिमंडळासाठी सुमारे ४०० अधिकारी दिमतीला राहणार आहेत. शुक्रवारी काही मंत्री शहरात दाखल झाले आहेत, तर काही मंत्री शनिवारी सकाळी येतील. सात वर्षांनी होत असलेल्या या बैठकीच्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परंपरा मोडायला निघाले आहेत. हॉटेल रामा आणि ताज या पंचतारांकित हॉटेल्समध्ये खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच औरंगाबाद आणि नाशिकहून तिनशे कार भाड्याने घेण्यात आल्या आहेत. जेवणाची थाळी दीड हजाराची असणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची सध्याची स्थिती पहाता बैठकीच्यानिमित्ताने मंत्र्यांच्या मौजमजेवर होणारा खर्च परवडणारा नाही, अशी टिका विरोधकांनी केली आहे.
संभाजीनगरात यापुर्वी मुख्यमंत्री असताना मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला होता. आता मंत्री ज्या ताज, रामा या पंचताराकींत हॉटेलात राहणार आहेत, त्या हॉटेलमध्ये एका दिवसाचे भाडे २२ ते २५ हजार रूपये आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर सडकून टिका केली आहे.
गेंड्याच्या कातडीचे सरकार : नाना पटोले
ओबीसी सह मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च वाढतो म्हणून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी नोकर भरती करण्याचा निर्णय सरकार घेते, शासन आपल्या दारी म्हणत जनतेच्या पैशावर कार्यक्रम करुन स्वतःची जाहीरातबाजी करते. हे सरकार असंवेदनशील असून जाहीरातबाजी, इव्हेंटबाजी व आता मंत्रिमंडळ बैठकीवर वारेमाप खर्च करणारे हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यातील खरीपाचे पीक वाया गेले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या शेतक-यांना सरकारने अद्याप काहीच मदत केली नाही. सरकारने जाहीर केलेल कांद्याचे अनुदान अद्याप दिले नाही.
मंत्र्यांचा थाट आणि शेतकऱ्यांची थट्‌‍टा : जयंत पाटील
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला ११२ क्विंटल कांद्याचे अवघे २५२ रुपयाचे अनुदान दिले आहे आणि दुसरीकडे मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीसाठी कोटी रुपये खर्च केले जात आहे. मंत्र्यांचा शाही थाट आणि शेतकऱ्यांची क्रूर थट्‌‍टा असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मंत्र्यांच्या थाटावर कडक शब्दात टीका केली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात अत्यल्प भावात कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून प्रती क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चिंचवाड येथील शेतकऱ्याने ११२ क्विंटल ९० किलो लाल कांदा विकला त्यानुसार ३९ हजार अनुदान मिळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त २५२ रुपये टाकण्यात आले. एकीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट… आणि दुसरीकडे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्याला अवघे २५२ रुपये अनुदान जमा करत सरकारने क्रूर थट्‌‍टा केली आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या: विजय वडेट्‌‍टीवार
सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे. १७ तारखेला होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मंत्री मराठवाड्यात पर्यटनासाठी येत आहेत का असा प्रश्न आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यवस्थापन करणारं हे पहिलं सरकार आहे. सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत. सरासरी प्रत्येक जिल्ह्यात मागच्या ऑगस्टमध्ये १००- सव्वाशे आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी त्रस्त आहे. ९६ तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असातना फाईव्ह स्टार व्यवस्था करून कॅबिनेट बैठक घेण्याची गरज का पडली हा खरा प्रश्न आहे. कॅबिनेटच्या नावाखाली मौजमस्ती करायला तर हे सरकार येत नाही ना, असा विषय चर्चेला आला आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटत असेल तर जरा तरी विचार करावा. फडणवीस सरकारने २०१६ ला दिलेलं पॅकेज मराठावाड्यातील जनता विसरली नाही. ५० हजार कोटीच्या पॅकेजचे काय झाले? मराठवाड्यातील जनता अशा नालायक सरकारला माफ करणार नाही, असेही वडेट्‌‍टीवार म्हणाले.
२९ मंत्री, ३९ सचिवांची राहणार उपस्थिती
या बैठकीसाठी २९ मंत्री, ३९ सचिव, मंत्र्यांचे स्वीय सहायक, विशेष कर्तव्य अधिकारी येणार आहेत. याशिवाय विभागातील आमदार देखील उपस्थित असतील. मंत्र्यांच्या वाहनांची तपासणी औरंगाबाद जिमखाना क्लब आणि पीव्हीआर थिएटरच्या आवारातील पार्किंगमध्ये आरटीओकडून केली जात आहे. सुमारे तीनशे वाहनांचा ताफा मंत्री मंडळाच्या बैठकीसाठी असणार आहे. मंत्र्यांच्या राहण्याची व्यवस्था रामा इंटरनॅशनल आणि ताज अशा पंचतारांकित हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. यासह सुभेदारी विश्रामगृह, सिंचन भवन आदी विश्रामगृह देखील आरक्षित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here