महापालिकेवर सवाल; MPCB अधिकारी कॉल उचलले नाहीत
साईमत जळगाव प्रतिनिधी:
लक्ष्मी नारायण नगर कॉलनी आणि अयोध्या नगर परिसरात पुन्हा एकदा नाल्यात रासायनिक व ऑईलयुक्त पाणी सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना काही पहिल्याच प्रकाराची नसून मागील तीन वर्षांत चार-पाच वेळा अशाच प्रकारची घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये संताप, भीती आणि आरोग्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
नाल्यात सोडण्यात आलेल्या रासायनिक पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, पाण्याचा रंग बदललेला दिसतो. नाल्याजवळील हवा आणि पाणी दूषित झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक त्रास होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
नगरसेवक विरेन खडके यांनी या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नगरसेवक खडके यांनी स्पष्ट केले, “नागरिकांच्या आरोग्याशी कुठलाही तडजोड होऊ देणार नाही. वारंवार अशा घटना घडत असल्यास जबाबदार व्यक्तींवर किंवा उद्योगांवर कठोर कारवाई आवश्यक आहे; अन्यथा आम्ही नागरिकांसह तीव्र आंदोलन करू.”
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत म्हटले आहे, “आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या, पण ठोस कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळेच अशा घटना पुनः घडत आहेत.” नागरिकांनी महापालिकेकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन स्पष्ट दिसत असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेणे गरजेचे आहे. शहरातील नाले, जलस्रोत आणि पर्यावरण सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, नागरिकांनी कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.दरम्यान, MPCB चे राजपूत साहेब आणि परदेशी साहेब यांचा फोन केला असता त्यांनी कॉल उचलला नाही.
