साईमत, मलकापूर: प्रतिनिधी
बजाज फायनान्सवरून लोन देतो, असे सांगून वेळोवेळी ६ लाख ४८ हजार २७४ रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या एका ठगाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे सव्वा लाखांच्या साहित्याचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. याघटनेवरुन कुणीही ऑनलाईन माध्यमातून कोणत्याही भुलथापांना बळी पडु नये, असे आवाहन मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना केले आहे.
सविस्तर असे की, नमुद गुन्ह्यातील फिर्यादी निवृत्ती महादेव रोकडे (वय ४०, रा. काटी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) यांना नमूद आरोपी बसंतकुमार राधाकांत साहु (वय ३०, रा. ग्राम कचरु, ता. हिंजली, जि. गंजाम, राज्य ओडीसा, ह.मु अमन नगर चाळ कुर्ला, प.) याने बजाज फायनान्स कंपनीद्वारे लोण मिळवुन देतो, असे सांगुन त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन माध्यमातून तसेच बँकेद्वारे विविध खात्यांमध्ये ६ लाख ४८ हजार २७४ रुपये पाठविण्यास सांगुन फसवणूक केली होती.
नमूद गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक सुनील खडासने, बुलढाणा अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी, मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे यांनी पीएसआय श्री.राठोड यांच्या नेतृत्वात पो.हे.कॉ. सचिन दासर, गणेश सूर्यवंशी, संदीप राखोंडे, म.पो.कॉ. वृषाली सरोदे अशी टिम तयार करुन तपास पथकाने ठाणे नगर पोलीस स्टेशन, जि.ठाणे येथे जावून नमूद आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तसेच पीएसआय राठोड यांचे बंधु पीएसआय गौरव राठोड नेमणूक ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या विशेष सहकार्याने नमूद आरोपीचा ३ दिवस कसोशीने शोध घेऊन त्यास शिताफीने पकडले. त्याच्याकडून १९ जुने वापरते मोबाईल, ३ जुने वापरते लॅपटॉप, १ जुने वापरते कलर प्रिंटर, मोबाईल व लॅपटॉप चार्जर, कि बोर्ड, माऊस तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी चालवित असलेले कॉल सेंटरचा पर्दाफाश करुन पो.स्टे मलकापूर ग्रामीण येथे आणून हजर केले. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप काळे करत आहेत.