Jagannath’s Chariot Procession To Navapur : नवापुरला भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेत ‘हरे रामा, हरे कृष्णाचा’ गजर

0
7

रथयात्रेत आ.शिरीषकुमार नाईक यांचा सहभाग ; भाविकांसोबत धरला ठेका

साईमत/नवापूर/प्रतिनिधी :

शहरात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)च्यावतीने भगवान जगन्नाथ यांची भव्य रथयात्रा मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली. पावसाची पर्वा ‌न करता शेकडो भाविकांनी रथयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यामुळे नवापूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. फुलांनी आणि रंगीबेरंगी वस्तूंनी सजविलेला भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि बंधू बलदेव यांचा रथ भाविकांनी जयघोषात ओढण्यास सुरुवात केली. ‘हरे कृष्ण, हरे रामा’च्या गजराने आणि मृदंग, टाळ यांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी केली. भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी भाविकांनी रांगोळ्या काढून आणि पेढे वाटून रथयात्रेचे स्वागत केले.

रथयात्रेला श्री हनुमान मंदिरापासून उत्साहात सुरुवात झाली. गांधी पुतळ्याजवळील हनुमान मंदिर येथून सुरू झालेली रथयात्रा मेन रोड, लाईट बाजार, सरदार चौक, राम मंदिर गल्ली, गुज्जर गल्ली, आंबेडकर चौक, बस स्थानक मार्ग आणि टाऊन हॉल अशा प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. रथ ओढण्याचे विशेष महत्त्व असल्याने जोरदार पाऊस असूनही भाविकांचा उत्साह जराही कमी झाला नाही. ‘हरे रामा हरे कृष्णा’ च्या गजरात भाविक भगवान जगन्नाथ यांचा रथ ओढून भक्तिरसात चिंब झाले होते.

रथयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी नवापूरकरांनी भगवान जगन्नाथांचे पूजन करून आरती केली. ‘हरे कृष्ण हरे रामा’ च्या जयघोषात भाविक भक्त नाचत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. रथयात्रेत नवापूर विधानसभा क्षेत्राचे आ.शिरीषकुमार नाईक यांचा जोशपूर्ण सहभाग पहायला मिळाला. ‘हरे कृष्ण हरे रामा’ च्या गजरात भाविकांसोबत त्यांनी ठेका धरला. त्यांनी रथयात्रेत भाविक-भक्तांसोबत सक्रिय सहभाग घेतला. ते ‘हरे रामा हरे कृष्णा’ च्या जयघोषात तल्लीन झाले होते. त्यांनी स्वतः रथ ओढून पवित्र सोहळ्यात योगदान दिले.

सर्वांसाठी सुख, समृद्धी अन्‌ शांती लाभण्याची केली प्रार्थना

इस्कॉनच्यावतीने आयोजित भगवान जगन्नाथ यांची ही भव्य रथयात्रा नवापूर शहरातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविस्मरणीय सोहळा ठरली. अशा सोहळ्याने शहरातील एकोपा, धार्मिक उत्साह अधिक दृढ केला. याप्रसंगी इस्कॉनचे अनेक संत, पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी भगवान जगन्नाथ यांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती लाभो अशी प्रार्थना केली. रथयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्यासह प्रसादाची व्यवस्था केली होती. सायंकाळी रथयात्रा नगरपालिका टाऊन हॉल येथे पोहोचल्यावर महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप केले. इस्कॉनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे नवापुरकरांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here