कार्यक्रमाचे ५० प्रयोग राज्यभर, राज्याच्या बाहेरही
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट अर्थात एनसीपीए ही देशातील अत्यंत विख्यात संस्था आहे. नरिमन पॉईंट येथे संस्थेचे सुंदर नाट्यगृह आहेत. संस्थेने जळगावमधील परिवर्तन संस्थेच्या ‘अरे संसार संसार’ बहिणाबाईंच्या कवितांचा व गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम मुंबईकर रसिकांसाठी आयोजित केला आहे. एनसीपीए सारख्या संस्थेने जळगावमधील कलावंतांना राष्ट्रीय व्यासपीठावर आमंत्रित करून जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव केला आहे.
कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची आहे. दिग्दर्शक नारायण बाविस्कर आहेत. गोविंद मोकाशी, श्रद्धा पुराणीक, मंजुषा भिडे, सोनाली पाटील, सुदीप्ता सरकार, भूषण गुरव, हर्षल पाटील, विशाल कुलकर्णी, यश महाजन, रोहित बोरसे, सुनीला भोलाणे, प्रतीक्षा कल्पराज, अक्षय नेहे आदी कलावंत कार्यक्रमात सहभागी आहेत. शंभू पाटील यांचे निवेदन आहे.
‘अरे संसार संसार’ कार्यक्रमाचे ५० प्रयोग राज्यभर व राज्याच्या बाहेर झालेले आहेत. हा कार्यक्रम बहिणाबाईंच्या कवितांसोबत जळगाव शहराचा इतिहास खान्देशी संस्कृती, कृषी संस्कृती, कष्टकरी महिलांचा इतिहास हे सगळं उलगडून सांगतो. त्यामुळेच देशभर याचे प्रयोग होत आहेत.
एनसीपीएसारख्या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित करून खान्देशच्या संस्कृतीचा गौरव केलेला आहे. जळगावमधील कलावंत परिवर्तनच्या माध्यमातून देशभर आपल्या संस्कृतीला घेऊन जातात ही जळगावकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. परिवर्तनच्या यशाबद्दल अशोक जैन, प्रा.डी.डी.बच्छाव, छबीराज राणे, अनिल कांकरिया, अनिश शहा, अमर कुकरेजा, डॉ.रेखा महाजन, नंदकुमार अडवाणी, डॉ.सोनाली महाजन यांनी कौतुक केले आहे.
