टी-२० विश्वचषकात रोहित कर्णधार होण्याची शक्यता?

0
44

नवीदिल्ली : वृत्तसंस्था

बीसीसीआयने गुरुवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. तिन्ही फॉरमॅटसाठी तीन कर्णधार बनवण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे संघाची घोषणा करताना बीसीसीआयने लिहिले की, “रोहित शर्मा आणि विराट कोहलीने या दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून विश्रांती मागितली होती, जी त्यांना देण्यात आली आहे.” म्हणजेच या टिप्पणीतून एक गोष्ट निश्चित आहे की, दोघांनाही टी-२० मध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे. विराट आणि रोहित टी-२० विश्वचषकासाठी पुनरागमन करतील, असे मानले जात आहे.
आयपीएलनंतर या प्रकरणावर निर्णय होऊ शकतो. रोहितसमोर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कर्णधारपदाचा प्रस्तावही देण्यात आला होती, मात्र त्याने सध्यातरी या प्रस्तावास नकार दिला आहे. १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सूर्यकुमार यादव टी-२० आणि के.एल. राहुल वन डेमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहेत. त्याचवेळी रोहित आणि विराट कसोटीत पुनरागमन करणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर रोहितने टी-२० मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला तर पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टी-२० च्या कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याला संधी मिळणार नाही. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “रोहितला टी-२० कर्णधारपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे, परंतु तो या सुट्टीमध्ये ब्रिटनमध्ये आहे आणि चार महिन्यांच्या व्यस्त हंगामानंतर त्याला विश्रांती हवी होती. कर्णधार म्हणून त्याला ड्रेसिंग रुममध्ये सर्वात जास्त आदर आहे आणि जर तो टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करण्यास सहमत असेल तर तोच कर्णधार
असेल.”
एका वृत्तानुसार, रोहितला ५० षटकांच्या क्रिकेट आणि विश्वचषकावर लक्ष केंद्रित करायचे असल्याने २०२२ च्या टी-२० विश्वचषक नंतर सर्वात लहान स्वरूप खेळण्यास तो तयार नव्हता मात्र, रोहित टी-२० विश्वचषकात पुनरागमन करू शकतो, कारण वेळोवेळी हार्दिकच्या दुखापतीच्या समस्येने निवडकर्त्यांच्या मनात शंका निर्माण केल्या आहेत तसेच, हार्दिक ज्या प्रकारे मुंबईत परतला त्यामागे रोहितची भूमिका असावी.
अशा परिस्थितीत रोहितने पुनरागमन करून त्याला कर्णधारपद दिल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. मात्र, त्याचा निर्णय थेट आयपीएलमध्ये घेतला जाऊ शकतो. पुढील आयपीएल हंगामात हार्दिक संघाचा कर्णधार बनतो की, रोहितच्या नेतृत्वात खेळतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. जर हार्दिकच्या नेतृत्वात रोहित आयपीएलमध्ये खेळला तर रोहित विश्वचषकातही त्याच्या हाताखाली खेळण्यास तयार होऊ शकतो अन्यथा रोहित परतणार नाही हे स्पष्ट होईल.
भारताला आठ टी-२०
सामने खेळायचे आहेत
पुढच्या मोसमात रोहितने संघाचे नेतृत्व केले तर तो टी-२० विश्वचषकात पुनरागमन करेल अशी शक्यता आहे. इतकंच नाही तर टी-२० विश्वचषकापूर्वी भारताला जास्त टी-२० खेळण्याची गरज नाही. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सह, टीम इंडिया सध्याच्या वेळापत्रकानुसार टी-२० विश्वचषकापर्यंत एकूण आठ टी-२० सामने खेळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here