चाळीसगावला धडक कारवाई : गावठी पिस्तूलसह दोघांना अटक

0
6

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

शहरासह परिसरात केलेल्या विविध कारवाईदरम्यान दोघांना गावठी बनावटीच्या पिस्तूलसह अटक केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. शिवम कैलास जगताप आणि अभिजीत चव्हाण अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. दरम्यान, दोघा आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पहिल्या कारवाईत चाळीसगाव शहरात पेट्रोलिंग दरम्यान पोलीस नाईक राहुल पाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. कारवाईत चाळीसगाव भडगाव रस्त्यावरील वडाळा वडाळी फाट्यानजीक माऊली हॉटेलजवळ शिवम कैलास जगताप याला गावठी बनावटीच्या पिस्तूल व चार जिवंत काडतुसासह अटक केली. त्याच्याकडून ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या कारवाईत हे.कॉ. सुधाकर अंभोरे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे चाळीसगाव भडगाव रस्त्यावरील अंबिका हॉटेलजवळ अभिजीत रतन चव्हाण याच्या कब्जातून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत. त्याच्या ताब्यातून ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. अटकेतील अभिजीत चव्हाण याने त्याच्याकडील पिस्तूल पाचोरा येथील समाधान बळीराम निकम याच्याकडून विकत घेतल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासकामी समाधान निकम याला अटक केली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here