सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्तम प्रकारे जोपासला समन्वय
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
येथील पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची अचानक बदली आहे. त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन व सर्वसामान्य नागरिकांमधील समन्वय उत्तम प्रकारे जोपासला होता. ज्या दिवसांपासून त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळला, तेव्हापासून त्यांनी शहरात आदरयुक्त दरारा निर्माण केला होता. न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेला सर्वसामान्य माणुस चेहऱ्यावर समाधान घेऊन परत येत होता. चाळीसगाव शहरातील सभ्य व सुज्ञ लोकांमधील पोलीस ही भिती काढून पोलीस हे सभ्य जनतेचे मित्र असतात, असा संदेश त्यांनी दिला आहे.
मोहब्बत भी है तुम्ही से, तुम ही से पहचान है, यह खाकी नही है साहब, यही तो मेरा इनाम है…! या ओळीप्रमाणे खाकीशी इमान राखत आपल्या ध्येयाप्रती समर्पण भावनेने कर्तव्य पार पाडणारे संदीप पाटील ‘मोडेन पण वाकणार नाही’ या ध्येयवादी विचारांपासून कधीही परावृत्त न होता कर्तव्याप्रती नेहमीच ठाम रहायचे. पोलिसांची जरब असलीच पाहिजे पण ती सर्वसामान्यांवर नाही तर गुंडांवर..! पोलिसी खाक्या दाखवत अनेक समाजविघातक कामे करणाऱ्या समाजकंटकांना त्यांनी कायद्याचा योग्य वापर करून वठणीवर आणले होते. शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.
जनतेचे आवडते ‘पोलीस अधिकारी’ म्हणून निर्माण केली ओळख
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून त्यांनी विविध स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविले. मागील महिन्यात ‘Happy Street’ ही अभिनव संकल्पना राबवली. त्यात जुन्या पारंपरिक खेळांचा परिचय करून दिला. या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी मुक्तकंठाने कौतुक करून यशस्वी आयोजनासाठी पाठीवर कौतुकाची थाप दिली. जनतेचे आवडते ‘पोलीस अधिकारी’ अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. भविष्यात चाळीसगावचे नागरिक संदीप पाटील यांची कारकीर्द कायमस्वरूपी लक्षात ठेवतील. त्यांच्या नुकत्याच झालेल्या बदलीनंतर त्यांना चाळीसगावकरांनी पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.