चाळीसगावला डेंग्यूसह सदृश्य आजारांची साथ वाढली

0
31

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरात सर्वत्र डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी खा.उन्मेश पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेत याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी लागलीच परिसरातील रुग्णालयात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. अशा आजारांमुळे ज्येष्ठ ते विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेकडून कुठलीही ठोस उपाययोजना राबविली जात नाही. त्यामुळे आपण याबाबत ठोस भूमिका घेण्याची विनंती केली. संतप्त नागरिकांना घेऊन खा.उन्मेश पाटील यांनी नगरपालिकेवर धडक दिल्याने पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले होते.

सविस्तर असे की, गेल्या आठवड्यात लक्ष्मीनगर परिसरातील नववीत शिकणाऱ्या उद्योन्मुख खेळाडू यश विवेक काळे याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यापासून शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. रुग्णालयात तापाने फणफणत असलेल्या रुग्णाला रक्त, लघवीची तपासणी करण्याचा सल्ला दिल्यावर रुग्णांमध्ये भीती दिसून येत होती. शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच खासदार जनसंपर्क कार्यालय परिसरातील विविध रुग्णालयातील नातेवाईक यांच्यामध्ये डेंग्यू सदृश्य आजाराची साथ असल्याची भावना वाढीस लागत होती. त्याच्या अनुषंगाने खा.उन्मेश पाटील यांनी सरळ पालिका कार्यालयात धडक दिली.

प्रशासनाची घेतली झाडाझडती

खा.उन्मेश पाटील यांनी थेट पालिका कार्यालयात धडक दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. तसेच मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, स्वच्छता निरीक्षक संजय गोयर, पाणी पुरवठा अभियंता राजीव वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर, ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुराधा खैरनार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे, पालिका प्रशासन अधिकारी यांनी धावत पालिका गाठली. यावेळी खा.उन्मेश पाटील यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली. तसेच उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासकीय दवाखान्यासह खासगी रुग्णालयात जावून रुग्णाची नोंदणी करुन उपचारासाठी मदत करावी, असे आदेश दिले. खा.उन्मेश पाटील यांनी आपण कागदोपत्री नोंदी न करता प्रत्यक्ष रुग्णांची आकडेवारी गोळा करावी, असे आदेशही दिले. अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्यामुळे प्रशासनाची बोबडी वळाली होती. यावेळी रुग्णांचे नातेवाईक, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here