साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शतकोत्तर शैक्षणिक वारसा असणाऱ्या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या विविध विभागात झालेल्या व होत असलेल्या अद्ययावत सुविधा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर सभासदांनी कौतुकाचा वर्षाव करत अभिनंदनाचा ठरावही केला. सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या प्रांगणात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभा विविध मुद्द्यावर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष रामकृष्ण पाटील होते.
व्यासपीठावर चेअरमन नारायण अग्रवाल, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, आ. बं. मुलांच्या विद्यालयाचे चेअरमन योगेश अग्रवाल, वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन सुरेश स्वार, आ. बं. मुलींच्या विद्यालयाचे चेअरमन ॲड. प्रदीप अहिरराव, श्यामलाल कुमावत, भोजराज पुंन्शी, अशोक बागड, जितेंद्र वाणी, नीलेश छोरिया, सर्व संचालक, विश्वस्त उपस्थित होते.
सभेचे इतिवृत्त सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी मांडले. यावेळी आ. बं. मुलांच्या व मुलींच्या विद्यालयात साकारलेल्या गणित लॅब, संगणक व विज्ञान प्रयोगशाळा, विविध विषयांचे दालन आदी सुविधांचे सभासदांनी कौतुक केले. एस. बी. सराफ विद्यालयाची वाढलेली पटसंख्या, शाळेची सजावट, वर्गखोल्या याबाबतही सभासदांनी गौरवोद्गार काढले. सभेत घटना दुरुस्ती, शालेय पोषण आहारावरही चर्चा झाली. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, सचिव डॉ. विनोद कोतकर, प्रदीप अहिरराव यांनी दिली.



