ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘प्रसाद’ ठरला प्रेरणादायी
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
येथील बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रसाद पवारने युपीएससी संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) आणि AFCAT परीक्षेत यश संपादन केले आहे. तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयातर्फे प्रसादचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. काटे, उपप्राचार्य आवटे, प्रा. पंकज वाघमारे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
टाकळी (प्र) गावातील प्रसाद संजय पवारने युपीएससीच्या (सीडीएस) २०२४ परीक्षेत संपूर्ण भारतात नववा क्रमांक (AIR-9) मिळवून भारतीय हवाई दलात स्थान मिळविले आहे. त्याआधी AFCAT २०२३ परीक्षेत त्याने ४४ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली होती. प्रसाद हा २०२३ मध्ये फिजिक्स विषयात पदवी वर्गाचा विद्यार्थी आहे.
यशाचे श्रेय दिले कुटुंबियांना
सामान्य शेतकरी कुटुंबातील प्रसादचे वडील, दिवंगत संजय उत्तम पवार यांच्या पश्चात त्यांच्या आई रत्नाबाई आणि बहिण जया यांनी कबाडकष्ट करून प्रसादला प्रवृत्त केले. प्रसादने आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबियांना दिले आहे. तसेच महाविद्यालयातील प्रा.वसईकर, प्रा. पंकज वाघमारे, प्रा.जोशी आदी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळेच यश मिळाल्याचे प्रसादने नमूद केले आहे. तसेच प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी त्याच्या यशाचे कौतुक केले आहे. यासोबतच प्रसादचे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायण अग्रवाल, सिनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेश स्वार, सर्व संचालक मंडळाने कौतुक केले आहे.