शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर केले मार्गदर्शन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील पाळधी येथील केंद्र शाळेत केंद्र स्तरीय शिक्षण परिषद नुकतीच उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे होते. यावेळी केंद्र आणि शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी केंद्रातील माळपिंप्री येथील पदवीधर शिक्षक पुखराज पवार यांचा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळाल्याने सत्कार करण्यात आला. यावेळी विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
शैक्षणिक वर्षीतील पहिलीच शिक्षण परिषद असल्याने आगामी काळातील वेगवेगळ्या उपक्रमांचे नियोजन केले होते. सुरवातीला पाळधी बाईज शाळेच्यावतीने आदर्श परिपाठ सादर करण्यात आला.सुरवातीला केंद्रातील मुख्याध्यापकांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आगामी नियोजनाच्या दृष्टीने केंद्रस्तरीय तज्ज्ञ शिक्षक समितीची निवड करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे यांनी केंद्रातील निपून महाराष्ट्र कार्यक्रमाचा आढावा घेतला. रत्नकांत सुतार यांनी मागील महिन्यातील गुणवत्तेचे अनुभव सादरीकरण केले.
‘माझा वर्ग माझे नियोजन’ विषयावर अशोक कोळी, हरिष पाटील यांनी मार्गदर्शन केले. नामदेव पाटोळे यांनी शैक्षणिक गुणवत्ता सद्यस्थिती यांचे दर्शन घडविले. श्री. सैंदाने यांनीही चर्चेत सहभाग घेतला. ज्योती पाटील यांनी पायाभूत चाचणी पूर्वतयारी कशी करावी, याविषयी सांगितले. आगामी काळात शालेय व्यवस्थापन समितीचे गठन कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले.
‘सुंदर शाळा माझी शाळा’ उपक्रमाचे कौतुक
यावेळी उपस्थित शिक्षकांनी पाळधी शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी केली. पाळधी शाळेतील ‘सुंदर शाळा माझी शाळा’ उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद कोळी यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उपशिक्षक हावडे यांनी केले.



