साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सहाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचे दिमाखदार उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शैलाबेन मयूर यांच्या हस्ते संस्थेचे ध्वजारोहण आणि एनसीसीच्या ९० कॅडेट यांनी पर्यवेक्षक एस.एस.पाटील, आर.पी.पाटील, जे. आर. बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्या गजानन पाटील ह्या विद्यार्थिनीच्या हस्ते ज्योत संचलन करून झाले. संस्थेच्या परंपरेप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचाही संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यात माजी उपमुख्याध्यापक एस. जी. डोंगरे, केके विभागाच्या माजी शिक्षिका एस. एस. कुलकर्णी, मुख्य लिपिक मिलिंद गुजराथी, सेवानिवृत्त सेवक सुरेश चौधरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी एस. एस. कुलकर्णी यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्यावतीने मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक पी. एस. गुजराथी यांनी शाळेच्या यशस्वी निकालाचा आढावा घेतला. वर्षभरात वक्तृत्व, निबंध, कला, क्रीडा, विज्ञान, शिष्यवृत्ती परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचा त्यांनी गौरव केला. शाळेत सुरू असलेल्या स्टेम फोरम, प्रतापीय कला मंच, आयआयटी फाउंडेशन, विद्यार्थी दत्तक योजना आदी विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी शासकीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या केंद्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या गणेश दीपक महाजन तसेच चतुर्थ क्रमांक पटकाविणाऱ्या प्रज्ञा विनायक महाजन या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गावातील विभागाच्या विद्यार्थ्यांनी एन. एन. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नयनरम्य लेझीम प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच वर्षभरात झालेल्या सहशालेय उपक्रमांच्या फोटो प्रदर्शनाचे आणि १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागस्तर भव्य फलक लेखन- रेखन महोत्सवाचे प्रदर्शन व उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेतील कलाशिक्षक पंकज नागपूरे, कमलेश गायकवाड यांनी केले. महोत्सवात जिल्हा (नाशिक, जळगाव, धुळे), राज्य व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ३० कलाशिक्षकांचा सहभाग होता.
चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कुल या नूतन वास्तूचे व पटांगणावरील खेळणी गृहाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन राजाभाई मयूर यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता इंग्लिश मीडियम स्कुल या विभागाचे ‘उडान’ शीर्षकावरील रंगारंग असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर, कार्यकारिणी सदस्य भूपेंद्र गुजराथी, किरण गुजराथी, शैलेश अग्रवाल, योगी मयूर, दुर्गादास पाटील यांच्यासह सर्व आजी-माजी मुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक व संस्थेच्या विविध ज्ञान शाखांचे पदाधिकारी, शिक्षक आणि लेखनिक कर्मचारी, समन्वयक गोविंद गुजराथी, डी.टी.महाजन, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
ईशस्तवन पी.बी.कोळी, पंकज नागपुरे आणि त्यांच्या समूहाने सादर केले. सूत्रसंचालन एजाज शेख, पंकज शिंदे तर आभार पर्यवेक्षक ए. एन. भट यांनी मानले.