साईमत, जळगाव, प्रतिनिधी
साळी समाजाचे आद्यदैवत आणि सृष्टीचे मूळ वस्त्र निर्माता भगवान जिव्हेश्वर यांची जयंती मंगळवारी राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला सकाळी 6 वाजता भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास डहाके यांनी पोथी वाचन केले. सत्यनारायणाची पूजा सौरभ-दिव्या वाव्हळ आणि अभिषेक-कल्याणी आदमने या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाज बांधव सुधाकर वाव्हळ होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष अरुण डहाके, विद्यमान अध्यक्ष राजु खेडकर, जिल्हाध्यक्ष अशोक दिवटे, कोषाध्यक्ष नाना भोगरे, सहसचिव पद्माकर आखडकर, नाना भागरे आदी उपस्थित होते.
स्वागतगीत दीपाली खंडारे, नेहा खंडारे यांनी म्हटले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच पदोन्नतीप्राप्त व सेवानिवृत्त झालेल्या समाज बांधवांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिव्हेश्वर पाळणगीत उषा साळी, योगिता धरम, जयश्री डहाके, प्रमिला पाठक यांनी सादर केले. कार्यक्रमाला समाज बांधव-भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुधीर खंडारे तर आभार सचिव किशोर खंडारे यांनी मानले.