साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर अजित पवार यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी चाळीसगावमध्ये जल्लोष साजरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे जल्लोष करत स्वागत करण्यात आले. फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला.
सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. यावेळी ‘एकच पर्व, अजित पर्व’, ‘अजितदादा तुम आगे बढो’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुशल देशमुख, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, सामाजिक न्याय विभागाचे किशोर सोनवणे, शांताराम निकम, खुशाल मोरे, युवक शहराध्यक्ष अर्जुन राजपूत, मंगेश साबळे, अनिकेत चव्हाण, दीपक शिंदे, बापू आमले, ऋषिकेश आमले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.