साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय आणि जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत विद्यार्थिनीसाठी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ (संरक्षण व प्रतिबंध मनाई निवारण अधिनियम २०१३) कायद्याबाबत एक दिवसीय जाणीव जागृती कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. त्यात ‘साडी डे’ चेही आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे होते. याप्रसंगी समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्रमुख वक्त्या ॲड. किशोरी नेवे, सागर नेवे, महिला तक्रार निवारण समिती प्रमुख एम.टी.शिंदे, डॉ. क्रांती क्षीरसागर, आरती पाटील, चेतन बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला माजी शिक्षणमंत्री कै.ना.अक्कासो.शरदचंद्रिका सुरेश पाटील आणि संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पणासह दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला प्रचिता पाटील हिने स्वागत गीत सादर केले.
याप्रसंगी ॲड. किशोरी नेवे यांनी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ’ विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, कामाच्या ठिकाणी अशी घटना घडल्यावर सर्वप्रथम तक्रार करण्यापासून सगळ्या बाबी कायदेशीर पद्धतीने समजावून घेतल्या पाहिजेत. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी महिलांनी घराबाहेर पडलेच पाहिजे. कोण काय म्हणेल त्याची पर्वा न करता स्वाभिमानाने जगले पाहिजे. याप्रसंगी त्यांनी अनेक उदाहरणे दिली. तसेच भारतीय दंड संहितेमध्ये महिलांच्या बाजूने कोणकोणते कायदे व तरतुदी आहेत. ह्या साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. कार्यशाळेनंतर उपस्थित महाविद्यालयातील युवतीने आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कल्पेश पाटील, विशाल पाटील, जीवन बागुल यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. वक्त्यांचा परिचय आर. पी. जयस्वाल यांनी करून दिला. प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख माया शिंदे, सूत्रसंचलन आर. पी. जयस्वाल, अश्विनी जोशी तर आभार विशाखा देसले यांनी मानले.