साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेज येथे ७६ वा ‘आर्मी डे’ तथा स्थल सेना दिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शहिदांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील यांचा त्यांच्या सैन्य दलातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते.
प्रास्ताविकात प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी स्वातंत्र्य काळानंतरच्या भारतीय सैन्य दलाची स्थापनेपासूनचा इतिहास सांगितला. तेव्हापासून ‘आर्मी डे’ साजरा करतात, याविषयी सांगितले. नायब सुभेदार भटू पाटील यांनी सैनिकांचे युद्धातील योगदान याविषयी माहिती दिली. यावेळी सुभेदार मेजर श्रीराम पाटील उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य पी.एम.कोळी यांनी आर्मी स्कुल इतर शाळांपेक्षा कशी वेगळी आहे, याविषयी सांगितले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील तर आभार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी शिक्षक जयेश मालपुरे यांनी मानले.



