खडसे फार्ममधील बैठकीत यु. डी.पाटील यांचे आवाहन
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस गावागावात लोकहितासह समाजहिताचे कामे करून साजरा करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष यु. डी.पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राची बैठक खडसे फार्म येथे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. बैठकीत लोकनेते माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांचा मंगळवारी, २ सप्टेंबर रोजी होणारा वाढदिवस तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत पक्षाची दिशा रणनीती भूमिका यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड.रवींद्र पाटील यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या बूथची बूथ रचना करून संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच २ सप्टेंबर रोजी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस आहे. सर्वांनी आपआपल्या गावात विविध लोकोपयोगी तसेच समाजहिताचे कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले. यादिवशी आ.नाथाभाऊ दिवसभर खडसे फार्म येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले.बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



