गणेश मंडळानी भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करा

0
29

फैजपुरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नापुर्णासिंग यांचे आवाहन

साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी :

येथे गणपती उत्सवात स्पर्धापेक्षा सर्वसमावेशकता दिसल्याने आनंद होत आहे. सर्वांनी एकत्रितपणे येवून कायद्याचे पालन करुन सावदा शहरातील सर्व गणेश मंडळानी भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन डीवायएसपी अन्नापुर्णासिंग यांनी केले आहे. येथील संभाजी महाराज मित्र मंडळातर्फे सालाबादप्रमाणे चावडी परिसरात “मोरया रे बाप्पा मोरया रे” च्या गजरात आकर्षक व भव्य श्री गणेशची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा मान यंदा फैजपुरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नापुर्णासिंग आणि माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांची कन्या सिमरन वानखेडे यांना मिळाला. यावेळी मान्यवरांसह गणेश भक्त उपस्थित होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी वरणगाव येथील देवदर्शनासाठी गेलेल्या भक्त गणांवर ओढवलेल्या दु:खद घटनेबाबत, कोठारी शास्त्री भक्ती किशोरदासजी महाराज अशा दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यानंतर वानखेडे, अकोले परिवार आणि संभाजी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून अन्नापुर्णासिंग यांचा पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावदा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील, कुर्बान मेंबर फैजपूर, माजी नगरसेविका रेखा वानखेडे, उपनगराध्यक्षा नंदा लोखंडे, माजी नगरसेवक सिद्धार्थ बडगे, शाम अकोले, निसार अहमद, हरी मामा, योगेश महाजन, साई वानखेडे आदी उपस्थित होते.

संभाजी मित्र मंडळाने ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीसाठी सोडला पथ मार्ग

यंदा सप्टेंबर महिन्यात ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सव योगायोगाने आल्याने संभाजी मित्र मंडळाचे नियोजित ठिकाण ऐवजी दोघा समाजात जातीय सलोखा कायम रहावा, याकरिता माजी नगरसेवक फिरोज खान (लेफ्टी)व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्व समावेशकतेला प्रथम प्रधान्य देणारे मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंडळाच्या बैठकीत असे ठरविण्यात आले आहे की, येत्या १६ तारखेला ईद-ए-मिलादची मिरवणूक मार्गस्थ करण्यासाठी मंडळाने पथ मार्ग सोडून एक अनोखा उपक्रम राबविला आहे. नेपाळ येथे दुर्घटनेत मयत झालेल्या आणि कोठारी भक्ती किशोरदास शास्त्री महाराज या सर्वांना खरी व भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मंडळांनी कोणतेच प्रकारचे वाद्य न लावता तसेच मिरवणुकीत सहभागी न होता गणेश विसर्जन करण्याचे ठरविले आहे. सर्व कार्यक्रमाची संकल्पना प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी उपस्थितांसमोर बोलून दाखवली आहे. त्याचे सर्वांनी आदराने पालन करावे, असे आवाहनही केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here