पंचर काढताना साधली संधी; डिक्कीतून लाखो रुपये गायब
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या जुन्या बस स्थानक परिसरात भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीने व्यापारी व नागरिकांत खळबळ उडाली आहे. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली तब्बल ८ लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने क्षणात लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. २५ फेब्रुवारी) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनी परिसरात राहणारे प्रेम महारू जाधव (वय ३५) हे एका खाजगी संस्थेत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते दुचाकी (एमएच १९ बीके ८१७६) वरून जुन्या बस स्थानकाजवळील संघवी पाईप परिसरातील एका पंचर दुरुस्तीच्या दुकानात गेले होते. त्यांच्या जवळ प्लास्टिकच्या पिशवीत १० लाख रुपये रोख रक्कम होती. ही रक्कम त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती.
दरम्यान, पंचर काढण्याच्या कामात ते व्यस्त असताना अज्ञात चोरट्याने संधी साधत दुचाकीची डिक्की उघडली आणि त्यातील १० लाखांपैकी ८ लाख रुपये चोरून नेले. काही वेळाने जाधव यांनी डिक्की उघडून पाहिले असता मोठी रक्कम गायब असल्याचे लक्षात येताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू करण्यात आली असून संशयितांच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. शहराच्या मध्यभागी दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा लवकरच माग काढण्यात येईल, असा विश्वास पोलीसांनी व्यक्त केला आहे.
