एमआयडीसी पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
मेडीकलवर औषधी घेण्यासाठी गेलेल्या एकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून ८३ हजार रुपयांची रोकड लांबविली आहे. ही घटना १० डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शेरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी दीपक रमेशचंद गगराडे यांचे संतोषी माता नगर येथे किरणा दुकान आहे. ते १० डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन दिवसभरात झालेला ग्राहकांचे गल्ल्यातील ८३ हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवले आणि ते (एमएच १९, सीएम, ३०३८) क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे निघाले. काशिनाथ चौकाकडून शेरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भूमी हॉटेलच्या समोर असलेल्या मेडीकलवर ते औषधी घेण्यासाठी गेले. औषधी घेवून ते दुचाकीने घरी गेले. त्यांनी दुचाकीची डिक्की उघडून बघितल्यावर त्यांना दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ८३ हजार रुपयांची रोकड दिसून आली नाही.
दीपक गगराडे हे दुचाकीच्या डिक्कीतून पैसे रस्त्यात पडले असावे, हे बघण्याकरीता ज्या रस्त्याने आले. त्याच रस्त्याने ते पैसे शोधत गेले. परंतू त्यांना पैसे मिळून आले नाही. त्यामुळे त्यांना खात्री झाली की, ते औषधी घेण्याकरीता मेडीकलवर गेले. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून पैसे चोरुन नेले. दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी पैसे चोरुन नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी करीत आहे.
