अज्ञात डंपर चालक अद्यापही फरार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील नशिराबाद येथील राणे हॉटेल समोर भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला होता तर इतर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, अखेर याप्रकरणी शनिवारी, १७ मे रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात डंपरचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील रहिवासी तेजस सुनील बिऱ्हाडे हा तरुण त्याचा भाऊ तुषार सुनील बिऱ्हाडे आणि त्याचा मित्र अजय अफलातून सपकाळे यांच्यासोबत गुरुवारी, १५ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नशिराबादकडून जळगावकडे दुचाकीने (क्र.एमएच १९ इएच ७११८) येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने (क्र.एमएच ०८ एपी ०७३५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत तेजस बिऱ्हाडेचा जागीच मृत्यू झाला होता तर त्याचा भाऊ सुनील बिऱ्हाडे आणि मित्र अजय सपकाळे गंभीर जखमी झाले होते.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर डंपर चालक डंपर रस्त्यावर सोडून अद्यापही फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करीत आहे.
