लसीकरणाविषयी विद्यार्थ्यांना दिले धडे
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाविषयी महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वैद्यकीय सुविधांअंतर्गत प्रा. तेजल खर्चे आणि महाविद्यालयीन वैद्यकीय सेलच्या इंचार्ज प्रा. रुतुजा पाटील यांनी केले. कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने आणि त्याच्या संभाव्य धोका वाढत असल्याने कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत आवश्यक ठरले. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या उद्घाटनाने झाली.
त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व सांगितले आणि कर्करोगासंबंधी जनजागृती करण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करणे किती आवश्यक आहे यावर जोर दिला. प्राचार्यांनी कर्करोगाच्या विविध प्रकारांची माहिती दिली आणि यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी सुस्पष्ट विचार व्यक्त केले. कार्यक्रमात मलकापूरचे डॉ. प्राची कोलते सोबतच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लि., पुणे येथील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी अनिल डोडेजा (डिव्हिजनल मॅनेजर), राजकुमार तांबे (क्षेत्र व्यवस्थापक), विक्रांत कुलकर्णी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह), आणि सुभाष अर्बट (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) यांनी कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाबाबत विस्तृत माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाच्या प्रक्रियेबद्दल आणि त्याच्या उपयुक्ततेबद्दल सखोल ज्ञान प्रदान केले.
डॉ. प्राची कोलते यांनी कर्करोग प्रतिबंधासाठी उपलब्ध असलेल्या विविध लसींवर मार्गदर्शन केले. यामध्ये विशेषतः एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लस या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करणारी प्रभावी लस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे तसेच महाविद्यालयातील मान्यवर प्राध्यापकांचे योगदान महत्वाचे ठरले. कार्यक्रमाला प्रा. संगीता खर्चे, प्रा. चैताली नारखेडे, प्रा. ऐश्वर्या भटकर, अनिता होळे, सुलभा पवार यांनी विशेष योगदानाने रंगत आणली.
शारीरिक स्वास्थ्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी या विषयावर अत्यंत उत्सुकतेने चर्चा केली आणि अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले. त्यांना कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी उपलब्ध असलेल्या लसींची माहिती मिळाली. उपस्थित विद्यार्थ्यांनी लसीकरणाचे महत्त्व समजून घेतले आणि त्यांनी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हे मुद्दे लक्षात घेतले.
कार्यक्रमाच्या समारोपात, डॉ. प्राची कोलते यांनी उपस्थितांना कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी व शारीरिक स्वास्थ्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले. प्रतिबंधासाठी लसींचा महत्व दर्शवणे होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कर्करोगाबाबतची जागरूकता वाढली आहे. त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व समजले.