शेतातून घरी आला अन्‌ शेतमजूर तरुणाने संपविले ‘जीवन’

0
9

पहुरला शिवनगर परिसरात पसरली शोककळा

साईमत/पहुर, ता. जामनेर /प्रतिनिधी

येथील शिवनगरात राहत्या घरात शेतमजूर तरुणाने गळफास घेऊन ‘जीवन’ संपविल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. सायंकाळी पाच वाजेला त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या गोकुळच्या अकस्मात मृत्यूमुळे शिवनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर असे की, गोकुळ दिलीप सोनार हा २८ वर्षीय तरुण आई आणि मोठ्या भावासोबत शिवनगरात वास्तव्यास होता. गोकुळ सोनार हा दुसऱ्यांची शेती जुपीने करत होता. कपाशीचा हंगाम संपल्याने कपाशी उपटून रब्बी हंगामात ज्वारी पेरण्यासाठी त्याची तयारी सुरू होती. शुक्रवारी सकाळी आई आणि मोठ्या भावासोबत तो शेतात गेला होता. उपटलेली कपाशी ओली असल्याने ती पेटविण्यासाठी पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणतो, असे सांगून तो शेतातून घराकडे निघाला. मात्र, एवढा वेळ का होतोय ? असे मोठ्या भावाने फोन करून विचारल्यावर फोन न लागल्याने मोठा भाऊ गजाननने शेजारच्यांनी संपर्क साधला. तेव्हा त्यांना लहान भावाने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. गोकुळ सोनारला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. डॉ. मयूरी पवार यांनी तपासणीअंती गोकुळला मयत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरी पवार यांच्या खबरीवरून पहुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भरत लिंगायत करीत आहेत.

विधवा मातेने फोडला हंबरडा

घटनेची माहिती मिळताच विधवा मातेने हंबरडा फोडला. लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या गोकुळला आईने व मोठ्या भावाने चांगले शिक्षण दिले होते. गोकुळ शेतीसह शेततळ्यांची कामे करीत होता. त्याने दहा-बारा तरुणांना शेततळ्यांच्या कामात रोजगार उपलब्ध करून दिला होता. त्याच्या अकस्मात निधनामुळे सोना परिवारावर दु:खाचा डांेगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here