साईमत, चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील घोडगाव नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी.बी. निकुंभ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात केंद्र सरकारची ‘एक राष्ट्र एक विद्यार्थी’ योजनेअंतर्गत अपार ओळखपत्र व विविध शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यासाठी पालक-शिक्षक संघाची सभा नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.पी.चौधरी होते. पालक-शिक्षक संघाचे सचिव एच. बी. मोतीराळे यांनी अपार ओळखपत्राविषयी माहिती दिली. देशातील सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्डसारखे एक अपारकार्ड दिले जाणार आहे. त्यासाठी एक स्वतंत्र ओळख क्रमांक असणार आहे.
विद्यार्थ्यांची आतापर्यंतची शैक्षणिक प्रगती, विविध उपक्रमातील सहभाग, भविष्यातील शैक्षणिक प्रवेश, विविध लाभाच्या शिष्यवृत्तीच्या योजना याची नोंद अपार कार्डमध्ये असणार आहे. अपारकार्डसाठी पालकांची संमती आवश्यक आहे. मुख्याध्यापक आर.पी. चौधरी यांनी फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, पालकांनी अभ्यासाकडे लक्ष ठेवावे. तसेच कॉपीमुक्त अभियानासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगितले. सभेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ, विविध शैक्षणिक समस्येवर चर्चा झाली.



